चवदार असा उन्हाळी चिवळ च्या भाजीचा झुणका
प्रस्तावना::
चिवळ ची भाजी ही फक्त उन्हाळ्यामध्ये येणारी भाजी आहे…… आंब्याच्या रसासोबत भाजी म्हणून खाता येणारी आणि ताव मारता येणारी अशी भाजी आहे…
साहित्य::
- पाव किलो चिव ळची भाजी
- तीन कांदे
- आठ ते दहा लसूण पाकळ्या
- 8 ते 10 हिरव्या मिरच्या
- एक मोठी वाटी बेसन
- एक लहान वाटी ज्वारीचे पीठ,
- फोडणीसाठी तेल
- जिरे, मोहरी
- पाव चमचा हळद
- एक चमचा तिखट
- अर्धा चमचा धनापूड
- पाव चमचा गरम मसाला
- चवीप्रमाणे मीठ
कृती::
चिवळची भाजी निवडून घ्या त्यामध्ये ज्या असणाऱ्या दांड्या असतील त्या वेगळ्या करून घ्या… भाजी व्यवस्थित निवडल्यानंतर तिला चांगले पाच ते सहा पाण्याने धुऊन घ्या..
कारण चिवळच्या भाजीमध्ये शेतातली माती लागलेली असते असतो… त्यामुळे भाजी कचकच लागू शकते .
त्यामुळे चांगली पाण्यामध्ये पाच ते सहा वेळा तिला स्वच्छ धुऊन घ्या. आणि तिला चिरून घ्या. .. तीन कांदे सोलून चिरून घ्या.
हे कांदे आपल्याला लांब असे कापायचे आहे याला कोंबडा कांदा असेही म्हणतात… मिरच्यांचे काप करून घ्या .
लसणाचे सुद्धा काप करून घ्या.. कोथिंबीर चिरून घ्या… कढईमध्ये कडकडीत असे तेल गरम करा… त्यामध्ये जिरे मोहरी घाला.
लसणाचे काप आणि मिरचीचे काप घालून व्यवस्थित परतवून घ्या. आता आपण जो कांदा चिरलेला आहे तो हाताने व्यवस्थित मोकळा करून घ्या…
आता चिरलेला कांदा तेलामध्ये घाला आणि चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्या… कांद्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा तिखट अर्धा चमचा धना पूड पाव चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित कांद्याचे मिश्रण परतवून घ्या…
कांदा चांगला तांबूस रंगावर झाला की त्यामध्ये चिवळची भाजी घाला.. चिवड्याची भाजी शिजत आली की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्या..
या भाज्यांमध्ये सुरुवातीलाच मीठ घालावे कारण झुणक्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स होते…. त्यानंतर एक वाटी ज्वारीचे पीठ घाला.
आणि बेसन पीठ थोडे थोडे घालून व्यवस्थित मिक्स करा. बेसन पीठ एकदाच घालायचे नाही थोडे थोडे घालून मग एकत्र परतवून घ्यायचे.
(तुम्हाला इथे मी एक मोठी वाटी बेसन पीठ दाखवले आहे तुम्हाला जर कमी आवडत असल्यास तुम्ही अर्धी वाटी बेसन पीठ घालून सुद्धा हा झुणका बनवू शकतात.. मात्र त्यामध्ये कमीत कमी पाव वाटी तरी ज्वारीचे पीठ घालावे त्यामुळे झुणका मोकळा मोकळा होईल…)
त्यानंतर त्यावर झाकण ठेवा आणि चांगले दोन ते तीन मिनिटे वाफ येऊ द्या. आणि झुणका चांगला ढवळून घ्या…
तुम्हाला झुणका कोरडा वाटत असल्यास आजूबाजूने थोडे त्यामध्ये तुम्ही तेल सोडू शकतात म्हणजे झुणका कढईला चिकटणार नाही…
आणि वरतून थोडा पाण्याचा शिपका तुम्ही मारू शकतात… आता पुन्हा दोन मिनिटे झाकण ठेवून वाफ येऊ द्या आणि त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला..
आपला चिवळ च्या भाजीचा झुणका तयार झालेला आहे…. चिव ळचा झुणका तुम्ही भाकरी सोबत पोळी सोबत खाऊ शकतात….
किंवा आंब्याच्या रसाच्या वेळेस तुम्ही भाजी म्हणून खाऊ शकतात…. आमच्याकडे याला तोंडी लावणे असे म्हणतात…. तर घ्या गरम गरम चिवळचा भाजीचा झुणका
…
टिप्स:::
चिवळची भाजी शिजण्यास जास्त वेळ लागत नाही एक ते दोन वाफेमध्ये ही भाजी शिजवून जाते… मात्र या भाजीला खूप वेळेस धुवावे लागते कारण आपण जेवढ्या वेळेस भाजी धुतो तेवढ्या वेळेस त्यामधून शेतातील माती निघतच जाते त्यामुळे भाजी एकदम जास्त पाण्यामध्ये धुवा… नाहीतर भाजी खाताना कचकच लागेल… त्यामुळे भाजी खाण्याची मजा जाते…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ:२० मिनिटे
परिमाण::३ व्यक्तीसाठी
