साखरेच्या तिळाच्या वड्या

प्रस्तावना::
तिळाच्या वड्याचा सर्वच बनवतात. पण त्या साखरेच्या बनवाव्या की गुळाच्या …गुळाच्या बनवताना जरा कठीण जाते त्यामुळे आता आपण बघणार आहोत साखरेची वडीची सोपी अशी पद्धत आणि खमंग अशा साखरेच्या तिळाच्या वड्या होतात.
साहित्य::

१ वाटी साखर
१ वाटी तीळ
१ चमचा तूप
कृती::
सर्वप्रथम तीळ चाळून गाळून व्यवस्थित निवडून घ्या. कारण तीळमध्ये खडे असतात. त्यामुळे आपली वडी कचकच लागू शकते.
आता हे तीळ कढई गरम करून त्यामध्ये खरपूस अशी भाजून घ्या. म्हणजे त्यातील कचवटपणा निघून जाईल आणि त्याची वडी खमंग बनेल.
कढई गॅसवर तापवून घ्या त्यामध्ये अर्धा चमचा तूप घाला.. तूप वितळले की त्यामध्ये एक वाटी साखर घाला.
ही साखर सारखी परतवत राहा साखरेला पाणी सुटले की हळूहळू साखर वितळायला सुरुवात होईल. आणि साखरेचा पाक होईल. साखरेचा पाक थोडा तांबूस रंगाचा होईल. साखरेचा पाक जास्त पक्का करायचा नाही.

नाहीतर त्याची पुन्हा साखर तयार होईल. साखरेचे पाणी पूर्णपणे झाले की मग त्यामध्ये भाजलेले तीळ घाला.
भरलेली तीळ घातल्यानंतर मिश्रण अल्टी पलटी करून घ्या. गॅस बंद करून घ्या आणि मिश्रणाचा सराटा च्या साह्याने गोळा करा.

आता ओट्याला तुपाचा हात फिरवून घ्या. तसेच लाटण्यालाही तुपाचा हात लावून घ्या. कारण लाटण्याला मिश्रण चिपकणार नाही.
आता हा गोळा तूप लावलेल्या भागावर घाला आणि हाताने व्यवस्थित गोल करून घ्या आता लाटण्याच्या साह्याने त्याची पोळी लाटून घ्या.

पोळी एकदम बारीक सर लाटावी. लगेचच सुरीच्या साह्याने त्यावर आपल्याला हव्या त्या आकाराच्या रेषा मारून घ्या.
आणि हळूहळू वड्या पाडत घ्या. नंतर सराटाच्या साह्याने वर उचकवून त्याच्या वड्या पाडून घ्या.
(आपल्याला शक्य तेवढी ही पोळी बारीक लाटायला हवी
आणि ही पोळी थंड होऊ देऊ नये कारण थंड झाल्यावरती लांबत नाही मग वड्या जाड असला राहून जातील. ही साखरेची वडी अत्यंत खमंग बनतात.)

ही वडी बनवताना पाक अगदी सोप्या पद्धतीने बनवला जातो म्हणून गुळापेक्षा साखरेची वडी पटकन तयार होते…चला तर मग एन्जॉय करूया तिळाची वडी…..

टिप्स::
साखरेचे पाणी झाल्यानंतर पाक झाला असे समजावे लगेचच त्यामध्ये आपण भरलेले तीळ घालतो. पाक झाला की नाही याची काळजी करावी लागत नाही.
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ २० मिनिटे
परिमाण::३ जणांसाठी
