वालाच्या शेंगांची हिरवी रस्सा भाजी

प्रस्तावना::
खानदेश भागातील हिरवा रस्सा भाजी ही अत्यंत स्पेशल आहे रोजच्या जेवणात खाल्ली जाणारी….. तसेच या वालाच्या शेंगा तर बापरे थंडीमध्ये एकदमच छान चवदार लागतात….
साहित्य:

- 250 ग्रॅम वालाच्या शेंगा
- पाच हिरव्या बारीक मिरच्या
- दहा लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
- कोथिंबीर
- पाव चमचा हळद
- पाव चमचा गरम मसाला
- पाव चमचा धने पूड
- जिरे, मोहरी
- फोडणी साठी तेल
- मीठ
- पाणी
कृती::
प्रथम वालाच्या शेंगा स्वच्छ धुऊन घ्या त्याचे नाक्यांपासून शिरा काढून घ्या आणि त्याचे एका शेंगाची दोन ते तीन तुकडे करा.
त्यामधील दाणे तसेच सालीचा सुद्धा आपण या भाजीमध्ये वापर करणार आहे. या सोललेल्या शेंगा पुन्हा पाण्याने धुऊन घेऊ.
शेंगा धुतल्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी घालून दहा ते पंधरा मिनिटे शिजवून घ्या. किंवा कुकरला एक शिट्टी घेऊन शिजवून घेऊ शकता.
हिरव्या चटणीची कृती::
पॅन गरम करून घ्या त्यामध्ये हिरव्या मिरच्या आलटून पलटून चांगल्या भाजून घ्या. त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्या.
मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या शेंगदाणे 10 लसूण पाकळ्या अद्रकाचा तुकडा पाव चमचा जिरे पाव चमचा धने पूड कोथिंबीर घालून थोडे पाणी घाला .
आणि त्याची बारीक अशी चटणी करून घ्या. लागल्यास तुम्ही थोडे पाणी अजून घालू शकतात चटणी एकदम बारीक करा आपली हिरवी चटणी आता तयार झालेली आहे..

एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी फोडणी घाला. त्यानंतर आपण केलेली हिरवी चटणी तेलामध्ये घाला .
आणि ती चांगली परतवा. त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला घालून चटणी चांगली तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.
चटणीला तेल सुटले की मग त्यामध्ये आपण शिजवलेल्या वालाच्या शेंगा घालू. इथे वालाच्या शेंगांची शिजवलेले पाणी आपण वापरलेले नाही.

दोन वाट्या पाणी गरम करून घेतले आहे आणि ते पाणी आपण शेंगां आणि चटणीच्या मिश्रणामध्ये घालू.
भाजीचे मिश्रण चांगले एकजीव करा.आता या भाजीवर अर्धवट झाकण ठेवून दोन ते तीन उकळ्या येऊ द्या. उकळ्या आल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला.

मीठ घातल्यानंतर पुन्हा त्याला दोन ते तीन उकड्या येऊ द्या….
उकळ्या आल्यानंतर गॅस बंद करा. आपली वालाच्या शेंगांची भाजी आता तयार झालेली आहे….. ज्वारीची भाकरी, चपाती पोळी फुलका यासोबत तुम्ही खाऊ शकतात.

टिप्स::
हिरवी चटणी वाटताना हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे भाजूनच चटणी करावी कारण शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या खरपूस भाजल्यामुळे आपले चटणीत कचवटपणा लागत नाही शेंगदाणे आणि मिरच्या कच्या राहिल्यास भाजीला उगीरपणा लागतो.
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ :१५मिनिटे
एकूण वेळ:४० मिनिटे
परिमाण :दोन व्यक्तींसाठी
