हिरवी उडदाची डाळ
प्रस्तावना ::-

हिरवी उडदाची डाळ ही खान्देशी भागातील भाजी असून चवीला फारच छान लागते. ही भाजी ज्वारीच्या भाकरी सोबत खाल्ली जाते
साहित्य::-
- अर्धा कप उडदाची डाळ
- दोन टेबलस्पून हरभरा डाळ
- एक बारीक चिरलेला कांदा
- पंधरा ते वीस खोबऱ्याचे काप
- आठ हिरव्या मिरच्या
- एक टेबलस्पून धने,
- एक टेबलस्पून गरम मसाला
- दोन चिमूट हळद
- आठ लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अद्रक तुकडा
- फोडणीसाठी तेल
- कोथिंबीर
- पाणी
- चवीप्रमाणे मीठ
कृती:
प्रथम उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुऊन घ्या आणि ज्याप्रमाणे आपण वरण शिजवतो.
त्याप्रमाणे कुकरमध्ये चार ते पाच शिट्या घेऊन शिजवून घ्या.
तव्यावर कांदा आणि खोबरं चांगले काळसर होईपर्यंत भाजून घ्या.
हिरव्या मिरच्या आणि धने सुद्धा भाजून घ्या.
मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली हिरवी मिरची भाजलेला कांदा, खोबरं, लसूण अद्रक भाजलेले धने आणि पाणी टाकून त्याचे वाटण करून घ्या.
बारीक अशी चटणी करून घ्या. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घालून चटणी घाला.
चटणी मध्ये हळद आणि गरम मसाला घालावा आणि चटणी चांगली परतून घ्यावी.
चटणीला तेल सुटले की चटणी परतली गेली आहे.
उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळीचे मिश्रण थोडे वरणाप्रमाणे घोटून घ्यावे.
हे मिश्रण चटणी मध्ये घालून व्यवस्थित एकत्र करावे. आता आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालावे.
त्यानंतर भाजीत चवीप्रमाणे मीठ घालावे.
भाजीवर अर्धे झाकण ठेवावे भाजीला तीन-चार उकड्या आल्यानंतर भाजीचा गॅस बंद करावा.
आता आपली हिरवी उडदाची डाळ तयार आहे.
टिप्स:
कुठलीही पातळ भाजी करताना नेहमी झाकण ठेवताना अर्धेच ठेवावे नाहीतर त्यावरील तेल भाजीतच मिक्स होऊन जाते. भाजीला तरंग येत नाही.
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ: २० मिनिटे
एकूण वेळ: १ तास
परिमाण: ५ जणांसाठी
