कांदा कचोरी

प्रस्तावना:
कांदा कचोरी ही राजस्थान मधील जोधपुर रेसिपी असून खमंग कुरकुरीत अशी आहे. गोड आंबट अशी खरपूस कचोरी लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारीआहे. चला तर मग बघूया कांदा कचोरीची रेसिपी..
साहित्य::

- दोन मोठ्या आकाराचे बटाटे
- दोन मोठे कांदे
- आठ ते दहा लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
- कोथिंबीर
- पाव चमचा हळद
- एक चमचा तिखट
- पाव चमचा गरम मसाला
- एक चमचा शोप
- एक चमचा अख्खी धने,
- अर्धी वाटी चिंचेची चटणी
- मीठ
- तळण्यासाठी तेल,
- एक मोठी वाटी मैदा
- पाणी
कचोरीची डो बनवण्याची कृती::
एका परातीमध्ये सर्वप्रथम आपण कचोरी तयार करण्यासाठी बाहेरील आवरण भिजवून घेऊ. एका परातीमध्ये एक मोठी वाटी मैदा घ्या. त्यामध्ये चार टेबलस्पून तेल घाला. चवीप्रमाणे मीठ घाला आता हे मिश्रण चांगले चोळून घ्या म्हणजे मैद्याला मोहन बसेल. मैद्यामध्ये पाणी घालून मैद्याचा डो तयार करून घ्या. झाकून ठेवा
आता आपण कचोरीच्या मधल्या सारणाची तयारी करणार आहोत.
कचोरीच्या सारण बनवण्याची कृती::
बटाटे कुकरमध्ये दोन शिट्या घेऊन उकडून घ्या. उकडलेले बटाटे सोलून घ्या. बटाटे सोलल्यानंतर बारीक स्मॅश करून घ्या.कांदा चिरून घ्या. कोथिंबीर ही चिरून घ्या. अद्रक लसणाची पेस्ट बनवून घ्या. धने आणि शोप याची जाडसर पूड करून घ्या. एका कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवा. तेलामध्ये कांदा चांगला तांबूस रंगावर परतून घ्या. त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट परतावा. त्यामध्ये पाव चमचा हळद घाला एक चमचा तिखट घाला तसेच पाव चमचा गरम मसाला ही घाला. आता मिश्रण चांगले परतवून घ्या. यामध्ये केलेली जाडसर धने आणि शोप याची पूड घाला. आता मिश्रणामध्ये चिंचेची चटणी दोन चमच घाला. त्यामध्ये उकडलेला स्मॅश केलेला बटाटा घाला. आणि या मिश्रण मध्ये चवीप्रमाणे मीठ घाला. मिश्रण चांगले परतवून घ्या. आपली आंबट गोड तिखट असे सर्व चवी मिक्स असणारे कांदा कचोरीचे सारण तयार झाले.
कचोरी बनवण्याची कृती::
कचोरीची डो (कणिक)चांगली मळून घ्या. त्याचे चपातीला गोळा बनवतो त्याप्रमाणे गोळे तयार करा. तसेच केलेल्या बटाट्याच्या सारणाचे ही छोटे छोटे गोळे करून घ्या. कणकेच्या गोळ्याची लाटून पारी करून घ्या. किंवा हातानेही तुम्ही पारी करू शकतात. त्या पारीमध्ये ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी पुरण भरतो त्याप्रमाणे वरील केलेल्या कांदा कचोरीचे सारणा चा गोळा भरून घ्या. आता ही भरलेली कचोरी लाटून घ्या साधारण पुरीच्या आकारा एवढी लाटून घ्या. याच पद्धतीने सर्व कचोऱ्या बनवून घ्या. आता कढईमध्ये तळण्यासाठी पुरेसे तेल घाला. एक कचोरी टाकून मंद आचेवर कचोरी वर झाल्याच्या सहाय्याने तेल सोडा. म्हणजे कचोरी फुलण्यास मदत होईल. आपली टुम्म अशी कचोरी फुगेल. कचोरी पलटी करून दोघं साईडने तळून घ्या. कचोरी चांगली तांबूस रंगावर झाली की कचोरी तळली गेली असे समजावे. या पद्धतीने सर्व कचोऱ्या तळून घ्याव्यात. त्यासोबत हिरव्या मिरच्या तळून घ्याव्यात. एका कचोरीला मध्ये होल पाडून त्यामध्ये चिंचेची चटणी घालून खाण्यास कांदा कचोरी तयार आहे. मध्ये आपण कांद्याचा जास्त वापर केलेला आहे त्यामुळे या कचोरीला कांदा कचोरी असे म्हटले जाते.

टिप्स::
कांदा कचोरी बनवताना आपण कांदा कचोरीच्या डो मध्ये मोहन घातलेले आहे जेणेकरून कांदा कचोरी खमंग होईल. कचोरी तयार करताना आपण कचोरी मध्ये तुपाचे मोहन सुद्धा घालू शकतो. इथे मी तेलाचे मोहन घातलेले आहे.
वेळ व परि माण::
तयारीची वेळ:३० मिनिटे
एकूण वेळ :६०मिनिटे
परिमाण: २ जणांसाठी
